छत्रपती संभाजीनगर : शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या मोहिमेत महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने मोठी कारवाई केली. बाबा पेट्रोल पंपाजवळ कारवाई करत पथकाने तब्बल १,८०० किलो प्रतिबंधित प्लास्टिकसह एक वाहन जप्त केले. जप्त केलेला माल थेट महापालिका मुख्यालयात जमा करण्यात आला असून, संबंधित वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.
शहरात वाढत्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर होत असल्याने महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नागरी मित्र पथकाने तपासणी मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान वाहन क्रमांक एमएच-२० जीसी ५३२२ मध्ये १,८०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक साठवलेले आढळले. तातडीने वाहन जप्त करून माल जप्त करण्यात आला.
जप्त केलेल्या मालाची पाहणी प्रशासक जी. श्रीकांत आणि उपायुक्त भोंबे यांनी केली. संबंधित व्यापारी आणि वाहन चालक आवेश तांबोळ यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रशासक श्रीकांत यांनी आणखी कठोर भूमिका घेतली आहे. दुकाने, गोदामे, ट्रान्सपोर्ट आणि अन्य ठिकाणी तपासणी करून प्रतिबंधित प्लास्टिक साठवणूक किंवा वापर करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांना देण्यात आले. या मोहिमेत अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महापालिकेच्या या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये आणि प्लास्टिक वापरणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, प्लास्टिकविरहित शहर मोहिमेला गती मिळणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*