छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात अनपेक्षित गोंधळ उडाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ पार पडल्यानंतर ते भाषणास प्रारंभ करताच काही कार्यकर्त्यांनी अचानक घोषणाबाजी केली. “ओबीसींवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी काळे झेंडेही दाखविले.
राम पेरकर यांच्यासह काही जणांनी जागेवरूनच घोषणाबाजी सुरू केली. यामुळे काही काळ वातावरण तंग झाले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे कार्यक्रमात क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.
कार्यक्रमातील हा गोंधळ शांत झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले भाषण पुन्हा सुरू केले. ते म्हणाले, “अशा प्रकारच्या शासकीय कार्यक्रमात चार लोक उभे राहून घोषणाबाजी करून प्रसिद्धी मिळवतात. अशा गोष्टींवर मी भाष्य करणार नाही.” त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
दरम्यान, ओबीसींच्या प्रश्नावरून राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना हा प्रकार घडल्याने विविध स्तरांतून चर्चा रंगल्या आहेत. शासकीय समारंभासारख्या महत्वाच्या कार्यक्रमात घोषणाबाजी होणे ही गंभीर बाब असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*