छत्रपती संभाजीनगर : संयुक्त राष्ट्रसंघाला यंदा नोव्हेंबर महिन्यात ७५ वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने जगभरातील ३५ देशांचे राजदूत २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत छत्रपती संभाजीनगरात दाखल होणार आहेत. या राजदूतांचा विशेष दौरा जागतिक वारसा स्थळ अजिंठा-वेरुळ लेणींच्या भेटीसाठी असणार असून, यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध राष्ट्रांचे राजदूत एकत्रित शहरात येण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी स्मार्ट सिटी कार्यालयात विभागप्रमुखांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना शहरातील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. रस्ते, चौक, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण, चौकाचौकात सौंदर्याकरण तसेच विद्युत रोषणाई करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. शहर चकचकीत करण्यासाठी कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असून, केंद्र सरकारकडून या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची शक्यताही आहे.
जी २० परिषदेनंतर पुन्हा एकदा शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवर झळाळी मिळण्याची संधी आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या जी २० परिषदेच्या वेळी शहराचा कायापालट झाला होता. विद्युत रोषणाई, आकर्षक कलाकृती, झाडे, कारंजे, रंगरंगोटी अशा पद्धतीने शहराचे सौंदर्यीकरण झाले होते. त्याच धर्तीवर आता राजदूतांच्या स्वागतासाठी शहर सजवले जाणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या या दौऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगरला जागतिक पर्यटन नकाशावर अधोरेखित होण्याची मोठी संधी आहे. अजिंठा-वेरुळ लेणी पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असले तरी यावेळी जागतिक राजनैतिक प्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे या स्थळांचे आणि शहराचे महत्व अधिक अधोरेखित होणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*