छत्रपती संभाजीनगर : “दिल्ली अब दूर नहीं” ही म्हण आता प्रत्यक्षात उतरली आहे. शहरातून दिल्लीसाठी आता प्रवास अधिक सुलभ होणार आहे. कारण एअर इंडियाकडून येत्या २६ ऑक्टोबरपासून दुपारच्या वेळेत नव्या विमानसेवेची सुरुवात करण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीसाठी दररोज तीन विमाने उपलब्ध राहतील. सध्या शहरातून एअर इंडियाचे एक आणि इंडिगोचे एक असे दोन विमानसेवा सुरू आहेत. नवीन फ्लाईट सुरू झाल्याने प्रवाशांसाठी पर्याय अधिक वाढणार असून, याचा थेट फायदा व्यावसायिक, उद्योजक आणि पर्यटकांना होणार आहे.
हिवाळी सत्राचे वेळापत्रक जाहीर
२६ ऑक्टोबर २०२५ ते २८ मार्च २०२६ या काळासाठी विमान कंपन्यांचे हिवाळी वेळापत्रक निश्चित झाले आहे. एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुपचे अक्षय चाबुकस्वार यांनी सांगितले की, “एअर इंडियाकडून दुपारच्या सत्रात दिल्लीसाठी एक अतिरिक्त विमान सुरू होत आहे. तसेच इंडिगोने पूर्वी रद्द केलेले हैदराबादचे दुसरे विमान आठवड्यातून तीन दिवसांसाठी पुन्हा सुरू केले आहे.” बंगळुरूचे विमान आता संध्याकाळऐवजी सकाळच्या सत्रात असेल, तर मुंबईसाठी दररोज सकाळ आणि रात्री अशी दोन विमाने पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
दिल्ली विमानाचे वेळापत्रक असे
✅ एअर इंडिया (सकाळची फ्लाईट): सकाळी ६ वा. दिल्लीहून उड्डाण, ८ वा. संभाजीनगरात आगमन; ८:४० वा. परतीचे उड्डाण, १०:३५ वा. दिल्ली आगमन.
✅ एअर इंडिया (दुपारची नवी फ्लाईट): दुपारी २ वा. दिल्लीहून उड्डाण, ३:५० वा. आगमन; ४:३० वा. परतीचे उड्डाण, ६:२० वा. दिल्ली आगमन.
✅ इंडिगो (सायंकाळची फ्लाईट): सायं. ४:५५ वा. दिल्लीहून उड्डाण, ६:४५ वा. आगमन; ७:१५ वा. परतीचे उड्डाण, रात्री ९:०५ वा. दिल्ली आगमन.
विमानांची क्षमता
एअर इंडियाचे सकाळचे विमान १६४ आसनी असून, त्यात ८ बिझनेस क्लास, २४ प्रीमियम इकॉनॉमी आणि १३२ इकॉनॉमी सीट्स आहेत. दुपारच्या नव्या विमानात १८२ आसने असून त्यात १२ बिझनेस क्लास व १७० इकॉनॉमी सीट्स असतील. इंडिगोच्या विमानात सर्व इकॉनॉमी सीट्स असून, दिल्लीसाठी १७६, मुंबईसाठी २३२ आणि हैदराबादसाठी ७८ आसने असतील.
पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला चालना
दिल्लीसाठी तीन विमानसेवा सुरू झाल्याने शहरातील एअर कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत झाली आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक बैठकांसाठी, सरकारी कामकाजासाठी तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठी सोय होणार आहे. सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी सांगितले की, “ही अतिरिक्त सेवा शहराच्या उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी देणारी ठरेल. प्रवाशांना दिल्लीसाठी वेळेची निवड करण्याची मोकळीक मिळेल.”
या नव्या फ्लाईटमुळे संभाजीनगर ते दिल्ली प्रवास आणखी जलद, सोयीस्कर आणि परिणामकारक होणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*