छत्रपती संभाजीनगर : आता विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि एथिकल हॅकिंग यांसारख्या आधुनिक आणि रोजगाराभिमुख विषयांचे शिक्षण घरबसल्या घेता येणार आहे. देशातील पहिली सरकारी डिजिटल युनिव्हर्सिटी म्हणून ‘नाइलिट’ (NIELIT) अंतर्गत ही अनोखी सुविधा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व कोर्स १०० टक्के ऑनलाइन असून, विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल लॅबच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रशिक्षण (प्रॅक्टिकल्स) घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार आणि गतीनुसार कोर्स निवडता येणार असून, प्रत्येक कोर्स पूर्ण केल्यानंतर नाइलिटकडून अधिकृत ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या युनिव्हर्सिटीचे उद्दिष्ट २०३० पर्यंत तब्बल ४० लाख तरुणांना डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रशिक्षण देण्याचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच लहान शहरांतील विद्यार्थीही उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण घेऊन रोजगारक्षम बनतील. छत्रपती संभाजीनगरसह देशभरात नाइलिटची ५६ केंद्रे, ७५० मान्यताप्राप्त संस्था आणि ९,००० हून अधिक सुविधा केंद्रे कार्यरत आहेत.

या डिजिटल युनिव्हर्सिटीद्वारे विद्यार्थी सायबर सुरक्षा, एआय, सेमीकंडक्टर डिझाईन, माहिती तंत्रज्ञान, एम्बेडेड सिस्टिम्स, इंडस्ट्री ४.०, क्लाउड कॉम्प्युटिंग, व्यक्तिमत्व विकास, माइंडसेट डेव्हलपमेंट, डेव्हसेकऑप्स आणि डीपक्राफ्ट यांसारखे कोर्स शिकू शकतात. हे अभ्यासक्रम सुरुवातीपासून अॅडव्हान्स लेव्हलपर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केले गेले आहेत. रोजगाराच्या दृष्टीने हे विषय सध्या सर्वाधिक मागणीत असल्याने तरुणांना स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

प्रवेश प्रक्रिया सोपी आणि परवडणारी

विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी सर्वप्रथम ndu.digital या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचा आयडी तयार करावा. त्यानंतर अभ्यासक्रम आणि शिकवणी भाषेची निवड करावी. काही कोर्सेसचे शुल्क केवळ ₹५९ इतके आहे. शुल्क भरल्यानंतर विद्यार्थ्यांना व्हिडिओ लेक्चर्स आणि स्टडी मटेरियलचा कायमस्वरूपी अॅक्सेस मिळेल.

हे सर्व कोर्सेस तीन महिन्यांच्या कालावधीचे असून ऑनलाइनसह ऑफलाइन शिक्षणाची सुविधाही उपलब्ध आहे. ऑफलाइन कोर्सेससाठी ३० तर ऑनलाइनसाठी ६० विद्यार्थ्यांची क्षमता ठेवण्यात आली आहे.

नाइलिटचे कार्यकारी संचालक जयराज किडव म्हणाले, “या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उच्च तांत्रिक शिक्षणाची संधी मिळणार आहे. उद्योग क्षेत्रात विद्यार्थ्यांना अधिक रोजगार संधी मिळतील आणि भारतातील डिजिटल कौशल्य वाढीस लागेल.”

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

604 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क