छत्रपती संभाजीनगर : वॉशिंग मशीन दुरुस्तीसाठी गुगलवर नंबर शोधणे एका डॉक्टर पत्नीला तब्बल २ लाख ६३ हजार ७८८ रुपयांना महागात पडले. सायबर भामट्याने ‘रिपेअर सर्व्हिस’ नावाची एपीके फाईल पाठवून तिचा मोबाईल हॅक केला आणि बँक खात्यातील सर्व पैसे लंपास केले. ही धक्कादायक घटना सिडको एन-३ परिसरात १७ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आरती महेंद्र सोनुने (वय २८, रा. अस्मिता अपार्टमेंट, एन-३ सिडको) या डॉक्टर पत्नी असून त्यांचे वॉशिंग मशीन नादुरुस्त झाले होते. दुरुस्तीकरिता १२ सप्टेंबर रोजी त्यांनी गुगलवर “Samsung Service” असा शोध घेतला. तेथे दिसलेल्या वेबसाईटवरील क्रमांकावर कॉल केला असता समोरच्या व्यक्तीने स्वतःला सॅमसंग सर्व्हिस सेंटरचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले. त्याने मशीनचे मॉडेल विचारून “रिपेअर सर्व्हिस” नावाची फाईल मोबाईलवर पाठवली व ती इन्स्टॉल करण्यास सांगितले.
आरती यांनी सांगितल्याप्रमाणे ती फाईल इन्स्टॉल केली आणि नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक भरला. त्यानंतर भामट्याने “तपासणीसाठी फक्त पाच रुपये पेमेंट करा” असे सांगितले. मात्र पेमेंट करताना अडचण आल्याचे सांगत भामट्याने “मी स्वतः पेमेंट करतो, तुम्ही रोख द्या” असे सांगून कॉल बंद केला. काही वेळातच त्यांच्या मोबाईलवर एक रुपयाचा व्यवहार दिसला आणि त्यानंतर पाच टप्प्यांत २ लाख ६३ हजार ७८८ रुपये खात्यातून गायब झाले.
त्यानंतर आरती सोनुने यांनी तत्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रार नोंदवली व बँकेचे खाते ब्लॉक केले. नंतर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात औपचारिक गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक अशोक भंडारे पुढील तपास करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*