छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथे २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ-घृष्णेश्वर आणि पैठण या तीर्थक्षेत्रांवरही भाविक आणि पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात ओघ वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध सुविधांची निर्मिती करण्यासाठी तब्बल ८७१९ कोटी रुपयांचा प्राथमिक कृती आराखडा तयार करण्यात आला असून, तो आणखी व्यापक आणि सूक्ष्म नियोजनासह पुन्हा सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

मंगळवारी (दि.७) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नियोजन बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमोर हा विषय उपस्थित केला. या बैठकीला मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

कुंभमेळा काळात सुमारे एक कोटी भाविक महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांना भेट देतील, असा अंदाज आहे. त्यात वेरुळ व पैठण या तीर्थक्षेत्रांना विशेष महत्त्व आहे. या भाविकांच्या सोयीसाठी परिवहन व्यवस्था, पार्किंग, राहण्याची सोय, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर दिला जाणार आहे.

आराखड्यानुसार, पाच ठिकाणी वाहनतळ आणि निवास व्यवस्था निर्माण करण्यात येईल. यात धुळे-सोलापूर महामार्ग (समृद्धी महामार्ग लगत), कन्नड लगत, खुलताबाद रस्ता (फुलंब्री बाजू) आणि राज्य महामार्ग-५२ लगत या ठिकाणी एकूण १३० हेक्टर क्षेत्रावर पार्किंग व निवास सुविधा उभारण्यात येतील. भाविकांसाठी तीन लाख लोक राहू शकतील अशा क्षमतेची तंबू शिबिरे, धर्मशाळा दुरुस्ती, स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र, अन्नक्षेत्र आणि हॉटेल-लॉज बुकिंगसाठी क्यूआर कोड प्रणाली लागू केली जाणार आहे.

सुरक्षा व्यवस्थेसाठी २४ तास सीसीटीव्ही आणि ड्रोन निगराणी, तात्पुरत्या पोलीस चौक्या, नियंत्रण कक्ष, महिला पोलिस पथके, गर्दी नियंत्रणासाठी बॅरिकेटिंग आणि सेप्रेशन वॉल्स उभारण्यात येतील. तसेच, हेलिपॅड आणि विश्रामगृहांची उभारणी करण्याचेही नियोजन आहे.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांमुळे वेरुळ, पैठण, अजिंठा, पितळखोरा, दौलताबाद आणि बिबी का मकबरा यांसारख्या ऐतिहासिक स्थळांवरही पर्यटकांची संख्या वाढेल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. महाशिवरात्री पर्वात दररोज दीड ते दोन लाख, तर सिंहस्थ पर्वात दररोज तीन लाख भाविक उपस्थित राहतील, असे या आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

971 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क