छत्रपती संभाजीनगर : सामाजिक आणि उद्यमशीलतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील सौ. रेखा प्रभाकर चव्हाण यांना प्रतिष्ठित संत ईश्वर फाउंडेशन राष्ट्रीय सन्मान 2025 ने गौरविण्यात आले आहे. या फाउंडेशनतर्फे दरवर्षी देशभरातील सोळा व्यक्तींना त्यांच्या कार्यातील योगदानाबद्दल सन्मानित केले जाते. या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातून सौ. चव्हाण यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.
सौ. रेखा चव्हाण यांनी “आई लोणचं” या उपक्रमाद्वारे समाजात महिलांसाठी रोजगारनिर्मितीचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. कोरोना काळात घरातून फक्त पाच किलो लोणच्यापासून सुरुवात केलेला हा छोटा व्यवसाय आज 40 टनांपर्यंत वाढला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज असंख्य महिला आणि पुरुष या उद्योगाशी जोडले गेले आहेत. “आई लोणचं” या नावाने आज त्यांचा व्यवसाय देशभर विस्तारला असून, उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेमुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
व्यवसाय लहान असो वा मोठा, त्यात प्रामाणिकपणा आणि मेहनत असेल तर यश नक्की मिळते, हे रेखा ताईंनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या यशाबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर तसेच फोन आणि मेसेजद्वारे त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हा पुरस्कार सोहळा केंद्राचे पर्यावरण मंत्री मा. भूपेंद्र यादव, माजी मुख्यमंत्री मा. शिवराजसिंह चव्हाण आणि संत ईश्वर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. दत्तात्रय भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला. 2024 मध्ये आमदार प्रशांत बंब यांनीही “आई लोणचं” उपक्रमाला पाठबळ दिले होते. सौ. रेखा चव्हाण यांचा हा सन्मान खुलताबादसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*