छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव आता अधिकृतपणे बदलले जाणार आहे. राज्य शासनाने या नावबदलास मंजुरी देत गॅझेट अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे लवकरच औरंगाबाद रेल्वे स्थानक “छत्रपती संभाजीनगर” या नव्या नावाने ओळखले जाईल.

औरंगाबाद शहराचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे करण्यात आले होते, मात्र रेल्वे स्थानकाचे नाव मात्र अद्याप जुन्याच नावाने चालू होते. याबाबत स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांकडून सातत्याने मागणी होत होती. अखेर राज्य शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये आवश्यक नियम लागू करत “छत्रपती संभाजीनगर” हे नाव रेल्वे स्थानकाला देण्याचा निर्णय घेतला असून त्याचे गॅझेट राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे संभाजीनगरकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शहराचे, जिल्ह्याचे आणि आता रेल्वे स्थानकाचे नावही छत्रपती संभाजीनगर झाल्याने ऐतिहासिक परंपरेला साजेसे परिवर्तन पूर्णत्वास आले आहे. शिवप्रेमी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, “छत्रपती संभाजी महाराज” यांच्या नावाशी जोडले जाणे हा अभिमानाचा क्षण असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव बदलून “संभाजीनगर” व उस्मानाबादचे नाव “धाराशिव” करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जिल्ह्याच्या नावात बदल करण्यात आला आणि आता रेल्वे स्थानकाचे नामकरणही औपचारिकरित्या पूर्ण झाले आहे.

रेल्वे प्रशासन लवकरच स्टेशनवरील फलक, माहितीफलक, तिकीट प्रणाली आणि डिजिटल बोर्डांवर नवीन नाव लागू करण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे आता शहरातील सर्व शासकीय व रेल्वे नोंदींमध्ये “छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन” असे नाव अधिकृतपणे दिसणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,399 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क