छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा सण संपताच लोकांच्या मनात तुळशी विवाहाची आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईची उत्सुकता निर्माण होते. पारंपरिक आणि धार्मिक दृष्टीने तुळशी विवाह हा शुभकार्यांच्या प्रारंभाचा दिवस मानला जातो. यंदा देवउठणी एकादशीनंतर विवाह सोहळ्यांना हिरवा कंदील मिळणार असून, नोव्हेंबरपासून जुलैअखेरपर्यंत तब्बल ५६ शुभ विवाह मुहूर्त असल्याची माहिती पुरोहित प्रवीण कुलकर्णी यांनी दिली आहे.

वैदिक परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून (देवशयनी एकादशी) ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास पाळला जातो. या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. त्यामुळे विवाह, गृहप्रवेश, मुंडन, उपनयन यांसारखी सर्व शुभ कार्ये या काळात टाळली जातात. यावर्षी देवशयनी एकादशी ६ जुलै रोजी झाली होती, आणि आता देवउठणी एकादशी २ नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात, आणि तेव्हापासून सर्व शुभ कार्यांना प्रारंभ होतो.

तुळशी विवाह हा कार्तिक शुक्ल द्वादशीला म्हणजेच २ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. पुढील तीन दिवसांपर्यंत – म्हणजे २ ते ५ नोव्हेंबर दरम्यान – तुळशी विवाहाचे मंगल सोहळे पार पडतील. या दिवसानंतर देशभरात लग्नसराईची लगबग सुरू होईल. दरवर्षीप्रमाणे या काळात सोने-चांदी, कपडे, फर्निचर, सजावटीच्या वस्तू, हॉटेल बुकिंग, मंडप सजावट आणि विवाहसोहळ्याशी संबंधित व्यवसायांना मोठी चलती मिळते.

पुरोहित प्रवीण कुलकर्णी सांगतात, “यंदा विवाह मुहूर्तांची संख्या मागील वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. विशेषतः फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक १२ मुहूर्त असून, लग्नाळूंना उत्तम पर्याय मिळणार आहेत. अनेक कुटुंबांनी आधीपासूनच हॉल बुकिंग आणि खानपानाची तयारी सुरू केली आहे.”

मुहूर्तांची यादी:

  • नोव्हेंबर – २२, २३, २५, २६, २७, ३०
  • डिसेंबर – ४, ५, ६ (यानंतर अस्त तिथी)
  • फेब्रुवारी – ३, ५, ६, ७, ८, १०, ११, १२, २०, २२, २५, २६
  • मार्च – ५, ७, ८, १२, १४, १५, १६
  • एप्रिल – २१, २६, २८, २९, ३०
  • मे – १, ३, ६, ७, ८, ९, १०, १३, १४
  • जून – १९, २०, २२, २३, २४, २७
  • जुलै – १, २, ३, ४, ७, ८, ९

हिंदू धर्मात विवाहसंस्काराला अत्यंत पवित्र स्थान आहे. विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे नव्हे, तर दोन कुटुंबांचे आणि दोन जीवांचे पवित्र बंधन. त्यामुळे विवाह मुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जाते. प्रत्येक जोडप्याची इच्छा असते की, देव-देवतांच्या साक्षीने, वेदमंत्रांच्या स्वरात, आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह संपन्न व्हावा.

दरम्यान, बाजारपेठेत आधीच लग्नाळूंची गर्दी दिसू लागली आहे. सोन्याचे दर वाढले असले तरी दागिन्यांबाबत महिलांचा उत्साह कमी झालेला नाही. सलून, पार्लर, डिझायनर कपडे, मेकअप आर्टिस्ट आणि फोटोग्राफर यांच्याकडेही बुकिंग सुरू झाले आहे.

एकंदरीत, तुळशी विवाहानंतर शुभकार्यांचा आणि आनंदसोहळ्यांचा हंगाम पुन्हा सुरू होत असून, पुढील काही महिने विवाहमय वातावरणातच शहर रंगणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

702 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क