छत्रपती संभाजीनगर : प्रवाशांसाठी सुरक्षित आणि परवडणारा प्रवास म्हणून ओळखली जाणारी राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस सेवा यंदाच्या दिवाळीमध्ये प्रवाशांच्या पसंतीस उतरली. दिवाळीच्या काळात म्हणजेच १७ ते २७ ऑक्टोबर या अकरा दिवसांत छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाने तब्बल ११ कोटी ७४ लाख ५३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत विक्रमी यश नोंदवले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या उत्पन्नात तब्बल १ कोटी ३२ लाख रुपयांनी वाढ झाली आहे.

दिवाळीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी ओसंडून वाहत असल्याने विभागाने नियमित ५३० बसगाड्यांसोबतच अतिरिक्त १४६ जादा बसेस सोडल्या. या सर्व बसांनी मिळून तब्बल २२ लाख ५८ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. यामुळे प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि सुटसुटीत प्रवासाची सुविधा मिळाली. गर्दीचा अंदाज घेऊन एसटी प्रशासनाने योग्य नियोजन केले होते, त्यामुळे कोणत्याही ठिकाणी वाहतूक अडचण निर्माण झाली नाही.

एसटी महामंडळाने यंदा अवकाळी पावसामुळे लोकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याचे लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे भाडेवाढ न करण्याचा निर्णय घेतला होता. तरीदेखील प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने एसटीला विक्रमी उत्पन्न मिळाले. खासगी वाहतूकदारांनी या काळात भाड्यात वाढ केली असली, तरी प्रवाशांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने एसटीचाच पर्याय निवडला.

गेल्या वर्षी दिवाळी दरम्यान एसटीला प्रतिदिन सरासरी ९४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र यंदा प्रतिदिन १०६ लाख ७७ हजार रुपयांचे सरासरी उत्पन्न नोंदवले गेले. तसेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ लाख ९ हजार किलोमीटर अधिक प्रवास करण्यात आला, ज्यामुळे एसटीच्या कामगिरीत मोठी झेप घेतल्याचे दिसून आले.

विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी सांगितले की, “दिवाळीच्या काळात प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने आणि तत्परतेने कर्तव्य बजावले. प्रवाशांच्या सुविधेसाठी सर्व स्तरांवर नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे प्रवासात कोणतीही अडचण निर्माण झाली नाही आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली.”

एसटी महामंडळाने सुरक्षित प्रवासाची परंपरा कायम ठेवत, या वर्षी दिवाळीत पुन्हा एकदा विश्वास आणि कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे. प्रवाशांचा वाढता विश्वास पाहता, आगामी सणासुदीच्या काळात एसटी आणखी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही सूचित करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

364 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क