सिल्लोड : अंभई परिसरातील रेलगाव येथे घडलेल्या एका अनोख्या आणि थरारक घटनेने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. गोवर्धन पूजनाच्या दिवशी पारंपरिक विधी करत असताना एका बैलाने तब्बल एक लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र गिळल्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे, हा दागिना 14 दिवसांनी शस्त्रक्रियेने सुरक्षित बाहेर काढण्यात आला आणि बैलाचे प्राणही वाचले.

ही घटना सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथील शेतकरी केवलसिंह श्रीभान चिल्हारे यांच्या घरी 22 ऑक्टोबरला घडली. गोवर्धन पूजनाच्या वेळी कुटुंबातील महिलांनी बैलाचे पारंपरिक औक्षण करण्यासाठी मंगळसूत्र ताटात ठेवले होते. मात्र ताटातील सामग्री नैवेद्य समजून बैलाने क्षणातच संपूर्ण मंगळसूत्र गिळले.

या घटनेनंतर चिल्हारे कुटुंबाने अनेक दिवस बैलावर लक्ष ठेवले. शेणातून मंगळसूत्र बाहेर पडते का, हे पाहण्यासाठी रोज निरीक्षण केले; पण काहीच हाती न लागल्याने त्यांनी अखेर पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला.

चिल्हारे यांनी सेवानिवृत्त सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. जी. एल. पाटेवाड यांच्याशी संपर्क साधला. 5 नोव्हेंबर रोजी डॉ. पाटेवाड यांनी रेलगाव येथे येऊन बैलाची तपासणी केली. एक्स-रेमध्ये मंगळसूत्र पोटात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल दोन तास चाललेल्या या जटिल ऑपरेशननंतर डॉक्टरांनी मंगळसूत्र सुरक्षितपणे बाहेर काढले.

या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे दहा हजार रुपये आला. मात्र मंगळसूत्र मिळाले आणि बैलाची प्रकृतीही उत्तम असल्याने चिल्हारे कुटुंबाचा आनंद ओसंडून वाहत होता. गावकऱ्यांनीही डॉक्टरांच्या कौशल्याचे भरभरून कौतुक केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,099 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क