छत्रपती संभाजीनगर : पैठणगेट परिसरात गेल्या आठवड्यात किरकोळ वादातून झालेल्या तरुणाच्या निघृण खुनानंतर मनपा प्रशासनाने तत्काळ सतर्कतेचा धागा पकडत मोठी कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील वाढलेल्या अतिक्रमणांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार नोटिसांचे मुदतकाल पूर्ण होताच बुधवारी, १९ नोव्हेंबर रोजी मनपाच्या अतिक्रमण पथकाने पोलिस बंदोबस्तासह पैठणगेट परिसरातील मोबाईल बाजार हटवण्याची मोहीम राबवली. दिवसभर चाललेल्या या मोहिमेत तब्बल ११८ अनधिकृत बांधकामे व दुकाने पाडण्यात आली.

अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १०.३० वाजता पथकाने कारवाईला सुरुवात केली. पैठण गेट–सब्जी मंडी मार्ग, क्रांती चौक–पैठण गेट मार्ग तसेच अन्य जोडरस्त्यांवरील अनधिकृत दुकाने, शेड, फलक, गॅरेज, साईनबोर्ड यासह कच्च्या बांधकामांची हटवणूक करण्यात आली. या कारवाईत मनपा आणि पोलिस विभागाचे मिळून २०० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. यासाठी १० जेसीबी, दोन पोकलॅन, १० टिप्पर, दोन रूग्णवाहिका, दोन अग्निशमन बंब आणि पाच इलेक्ट्रिक हायड्रॉलिक वाहने तैनात करण्यात आली होती.

अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या काही जिर्ण झालेल्या संरचनांमध्ये परवानगीशिवाय दुकाने सुरू करण्यात आली होती, तसेच वरच्या मजल्यावर तीन कुटुंबांनी वास्तव्यही केले होते. आजच्या कारवाईदरम्यान या अनधिकृत संरचनांची पाहणी आणि सत्यता पडताळून मनपाने ती संपूर्णपणे भुईसपाट केली. बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवून कारवाई निर्विघ्न पार पडावी यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, खूनप्रकरणानंतर नगररचना विभागाने पैठणगेट परिसराचे टोटल स्टेशन सर्वेक्षण करून येथील रस्ते विकास आराखड्यानुसार किती रुंद असावे हे स्पष्ट केले. पैठणगेट–क्रांती चौक रस्ता ३० मीटर, पैठणगेट–सब्जी मंडी रस्ता ९ मीटर तर पैठणगेट–खोकडपूरा रस्ता १२ मीटर असणे आवश्यक असल्याचे आढळले. या मार्गांवर १०० हून अधिक अनधिकृत संरचना असल्याचेही समोर आले. दिलेल्या नोटिसांना प्रतिसाद देताना फक्त चार ते पाच दुकानदारांनीच परवानगीसंबंधी कागदपत्रे सादर केली होती.

पैठणगेट परिसरातील सनी सेंटर इमारतीवरही कारवाई करण्याचे नियोजन होते. मात्र, इमारत मालकाने न्यायालयात धाव घेतल्याने ही कारवाई तात्पुरती स्थगित ठेवण्यात आली. आज गुरुवारी गोल्फ मैदान रस्त्यावर अतिक्रमण हटवण्याची मोठी मोहीम राबवली जाणार असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,494 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क