छत्रपती संभाजीनगर : किलेअर्क येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल आढळल्याने मोठा गोंधळ उडाला. गवारीच्या शेंगांच्या भाजीत पाल असल्याचे निदर्शनास येताच विद्यार्थ्यांनी जेवणावरूनच एकच आरडाओरडा केला. या प्रकारानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ, चक्कर आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या धक्कादायक प्रकारामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली.
घटना सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. समाज कल्याण विभागाच्या एक हजार क्षमतेच्या या वसतिगृहातील युनिट क्रमांक एकमध्ये जेवण सुरू असताना गवारीच्या भाजीत पाल असल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांनी तत्काळ मेसमध्ये गोंधळ घालून प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र, मेस चालकाने चूक मान्य करून माफी मागितली, तरीही विद्यार्थ्यांचा संताप ओसरला नाही.
घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. हे आंदोलन रात्री साडेअकरापर्यंत सुरू होते. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील असुविधा, निकृष्ट दर्जाचे जेवण, स्वच्छतेचा अभाव आणि अनेक प्रलंबित तक्रारींचा पाढा अधिकाऱ्यांसमोर मांडला.
दरम्यान, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त आर.एम. शिंदे यांनी घटनास्थळी येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले की, भोजन व्यवस्थेतील त्रुटींवर तातडीने कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा गंभीर घटना होऊ नयेत म्हणून कठोर उपाययोजना केल्या जातील.
विद्यार्थ्यांनी मात्र योग्य सुधारणा होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रकरणामुळे वसतिगृहातील जेवण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*