केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे देशभरातील शैक्षणिक संस्थांना देण्यात येणाऱ्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रैंकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ) रँकिंगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या गटात देशात ४६ वा, तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावला आहे. मागील वर्षी विद्यापीठाला पहिल्या १०० मध्येही स्थान मिळाले नव्हते, त्यामुळे ही घवघवीत यशाची नोंद आहे.
केंद्र शासनाकडून १०० कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाल्यानंतर विद्यापीठाने विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्या, ज्यामुळे हे यश मिळवता आले. यंदाच्या रँकिंगमध्ये चेन्नईच्या अन्ना विद्यापीठाने राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला, तर कोलकाताच्या जाधवपूर विद्यापीठाने दुसरा क्रमांक पटकावला. पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तिसरे स्थान मिळवले आहे.
राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या गटात महाराष्ट्रातील चार विद्यापीठांना स्थान मिळाले आहे, ज्यामध्ये मुंबई विद्यापीठ १८व्या स्थानी, सीओईपी विद्यापीठ पुणे ३३व्या स्थानी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ४६व्या स्थानी आहे.
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या नेतृत्वाखाली अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. गुलाब खेडकर यांनी विविध विभागांमध्ये केलेल्या प्रयत्नांमुळे हे यश मिळवता आले असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या यशामध्ये सर्व विभागांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*