छत्रपती संभाजीनगर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित ०५–औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची नव्याने मतदार यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादीचा प्रसिध्दी दिनांक ३ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आला होता. या नियोजनाप्रमाणे विभागीय आयुक्त कार्यालयात आज प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली.
यावेळी विभागीय आयुक्त तथा पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पापळकर, अपर आयुक्त व सहायक मतदार नोंदणी अधिकारी श्रीमती मंजुषा मिसकर तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विभागातील आठ जिल्ह्यांमधील मतदारांची अद्ययावत आकडेवारी या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 46,406 पुरुष, 15,908 महिला आणि 4 तृतीयपंथी मिळून एकूण 62,318 मतदार नोंदवले गेले आहेत. जालना जिल्ह्यात 28,922 तर परभणी जिल्ह्यात 20,700 मतदारांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात 6,476 पुरुष व 1,528 महिला अशा एकूण 8,004 मतदारांची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात 30,135, लातूर जिल्ह्यात 22,487, धाराशिव जिल्ह्यात 20,809 तर बीड जिल्ह्यात 47,174 मतदार असल्याचे यादीत नमूद आहे. विभागातील सर्व आठ जिल्ह्यांचा विचार करता एकूण 1,88,771 पुरुष, 51,763 महिला आणि 15 तृतीयपंथी मिळून एकूण 2,40,549 मतदार असल्याची माहिती निवडणूक कार्यालयाने दिली.
प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे दावे आणि हरकती स्वीकृतीचा कालावधी राहतो. कलम १२ अन्वये दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२५ असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत प्राप्त होणाऱ्या सर्व दावे व हरकती ५ जानेवारी २०२६ पूर्वी निकाली काढण्यात येणार आहेत.
यानंतर अंतिम मतदार यादी १२ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी प्रारूप यादीतील चुका, नावाची नोंद किंवा वगळण्याबाबत आवश्यक तक्रारी वेळेत दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*