छत्रपती संभाजीनगर : शहरातील कचरा संकलन व वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार असून, महापालिकेने गुजरात येथील ‘वेस्टर्न इमॅजिनरी’ कंपनीला हे कंत्राट दिले आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून ही कंपनी अधिकृतपणे काम सुरू करणार आहे. त्यापूर्वी शहरातील कचरा संकलनाचे नियोजन करण्यासाठी कंपनीने सध्या घराघरांचा सर्व्हे सुरू केला आहे. कंपनीचे कर्मचारी विविध वसाहतींमध्ये फिरून घरांचे फोटो घेत असून, त्यासोबत गुगल लोकेशनही नोंदवले जात आहे.
या सर्व्हेच्या माध्यमातून घंटागाडीचे रुट, कॉलनीतील घंटागाडीचे थांबे आणि कचरा संकलनाचे अचूक नियोजन केले जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सुमारे तीन ते सव्वातीन लाख मालमत्ता आहेत. या सर्व्हेसाठी कंपनीने गुजरातमधून ३० ते ३५ कर्मचारी आणले असून, स्थानिक तरुणांनाही या कामात सहभागी करून घेतले आहे. सर्वेक्षणासाठी विशेष मोबाईल अॅप देण्यात आले असून, त्याद्वारे घरांचे फोटो व लोकेशन अपलोड केले जात आहेत.
सध्या हैदराबाद येथील रेड्डी कंपनी मागील सात वर्षांपासून शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम करत आहे. मात्र, जानेवारी २०२६ मध्ये त्यांचा करार संपत असून, १ फेब्रुवारीपासून नवीन कंत्राटदार म्हणून वेस्टर्न इमॅजिनरी कंपनी कामकाज सांभाळणार आहे. अहमदाबाद, राजकोट आणि वडोदरा येथे कंपनीने केलेले काम, मिळालेले परिणाम आणि निविदेत दिलेला दर या निकषांवर कंपनीची निवड करण्यात आली आहे.
नवीन व्यवस्थेनुसार, शहरातील प्रत्येक एक हजार ते बाराशे घरांमागे एक घंटागाडी राहणार आहे. सध्या घंटागाड्या अनेकदा वेळेवर न येणे, आठवड्यातून एखाद-दोन दिवस काम न करणे किंवा रुट बदलणे असे प्रकार घडतात. मात्र, आता कंट्रोल रुमद्वारे प्रत्येक घंटागाडीवर थेट नजर ठेवली जाणार आहे. ठरलेल्या पॉइंटवर घंटागाडी पोहोचल्यास ग्रीन सिग्नल, तर न पोहोचल्यास रेड सिग्नल दिसणार आहे. रुट बदलल्यास त्वरित सूचना मिळणार असून, कारण द्यावे लागेल. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*