छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील नव्या नगरसेवकांच्या प्रशासनाच्या स्वागतासाठी महापालिका मुख्यालयाला नवे, आकर्षक रूप देण्याच्या दृष्टीने नूतनीकरणाची कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत. रंगरंगोटी, अंतर्गत सजावट आणि आधुनिक सुविधांचा समावेश करून महापालिका इमारत अधिक अद्ययावत करण्यात येत आहे. या नूतनीकरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून सर्वसाधारण सभा सभागृहाच्या (जीबी हॉल) प्रवेशद्वारावर अत्याधुनिक फेस रीडिंग मशीन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या नव्या प्रणालीमुळे आता नगरसेवकांना सभागृहात प्रवेश करताना चेहरा स्कॅन करावा लागणार आहे. फेस रीडिंगद्वारेच नगरसेवकांची उपस्थिती नोंदवली जाणार असून यामुळे उपस्थिती प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. यापूर्वी सभेच्या दिवशी नगरसेवक थेट सभागृहात जाऊन आपल्या आसनावर बसत असत. त्यानंतर महापालिकेचे कर्मचारी त्यांच्या आसनापर्यंत जाऊन उपस्थिती रजिस्टरवर स्वाक्षरी घेत असत. आता ही पद्धत बदलून डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित प्रणाली लागू केली जाणार आहे.
महापालिका मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सर्वसाधारण सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी बुधवारी (दि. ७) केली. यावेळी त्यांनी फेस रीडिंग प्रणालीमुळे वेळेची बचत होणार असून उपस्थिती नोंदविण्याची प्रक्रिया अधिक अचूक होईल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, सभागृहातील प्रेस गॅलरीमध्ये काचेची भिंत बसविण्यात आली असून त्याला लागूनच प्रेक्षकांसाठी स्वतंत्र गॅलरी तयार करण्यात आली आहे. ही प्रेक्षक गॅलरी प्रथमच सुरू करण्यात येत असून यामुळे नागरिकांना थेट सभागृहातील कामकाज पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र, सभेचे कामकाज पाहण्यासाठी इच्छुक नागरिकांना दोन नगरसेवकांचे शिफारस पत्र आणणे आवश्यक राहणार आहे. हे पत्र महापौरांकडे सादर केल्यानंतर त्यांच्या परवानगीनेच संबंधित नागरिकाला प्रेक्षक गॅलरीत प्रवेश दिला जाणार आहे.
या सर्व बदलांमुळे महापालिकेच्या कामकाजात आधुनिकता, पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*