छत्रपती संभाजीनगर : नव्याने सुरू झालेल्या एका कपड्याच्या दालनाच्या उद्घाटनाच्या दिवशीच जाहीर करण्यात आलेल्या तगड्या ऑफरमुळे रविवारी (दि. ४) मोठी चेंगराचेंगरी झाल्याची घटना आकाशवाणी चौक परिसरात घडली. सोशल मीडियावर जोरदार जाहिरात झाल्याने शहरासह वाशिम, जालना, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यांतून शेकडो महिला व नागरिक खरेदीसाठी सकाळपासूनच येथे दाखल झाले होते. उद्घाटनानंतर अवघ्या एका तासात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
सकाळी ११ वाजता दुकानाचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ऑफरचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी एकाच वेळी दुकानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. दुकानाला केवळ एकच शटर असल्याने प्रवेशद्वारावर प्रचंड गोंधळ उडाला. कसेबसे आत शिरलेल्या महिला व नागरिकांनी दिसेल ती वस्तू उचलण्यास सुरुवात केली. गर्दी वाढत गेल्याने दुकानदाराचे नियंत्रण सुटले आणि काही क्षणातच चेंगराचेंगरी सुरू झाली.
या गोंधळात अनेक महिलांना श्वास गुदमरल्यासारखे होऊन चक्कर येऊ लागली. दुकानाच्या आत जितकी गर्दी होती, त्यापेक्षा अधिक लोक बाहेर थांबले होते. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच एका नागरिकाने डायल ११२ वर कॉल करून घटनेची माहिती दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिक कुमक मागवून पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले. पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत चक्कर आलेल्या महिलांना सुखरूप बाहेर काढले.
सर्व नागरिकांना बाहेर काढल्यानंतर पोलिसांच्या स्पिकरवरून दुकान बंद करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, तरीही काही काळ नागरिकांनी परिसरात तळ ठोकून ठेवला होता. विशेष म्हणजे, दुकानाच्या उद्घाटनाबाबत व संभाव्य गर्दीबाबत दुकानदाराने पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. एवढी गर्दी जमवून नागरिकांचा जीव धोक्यात घालण्यात आला असून, याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी सांगितले. वेळेत पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*