छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तब्बल पाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या ताब्यात आली असून, या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहाचे संपूर्ण रूपडे बदलण्यात आले आहे. प्रशासनाने सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च करून सभागृह अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज केले असून, ते आता एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयाप्रमाणे झगमगीत आणि नियोजनबद्ध स्वरूपात उभे राहिले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत यंदा प्रथमच प्रभागनिहाय मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. २९ प्रभागांतून एकूण ११५ नगरसेवक निवडून आले असून, या नव्या लोकप्रतिनिधींसाठी प्रशासनाने आधीच सुसज्ज सभागृह सज्ज ठेवले आहे. हे नूतनीकरण केवळ सौंदर्यवृद्धीसाठी नसून, बदलत्या राजकीय आणि प्रशासकीय गरजांनुसार करण्यात आलेली व्यवस्था असल्याचे सांगितले जात आहे.
सभागृहात प्रत्येक नगरसेवकासाठी भविष्यात संगणकीय माध्यमातून कामकाज करता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कागदांचा ढीग, घोषणाबाजी आणि गोंधळ कमी होऊन नियोजनबद्ध चर्चा घडतील, असा दावा प्रशासनाने केला आहे. यापूर्वी सभागृहात आवाजाचा गोंधळ, आरोप-प्रत्यारोप आणि घोषणांची स्पर्धा हे नेहमीचे चित्र होते.
आता अत्याधुनिक ध्वनिव्यवस्था बसवण्यात आल्याने प्रत्येक नगरसेवकाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येणार आहे. नगरसेवकांची संख्या वाढल्याने आसनव्यवस्थेत बदल करण्यात आले असून, सभागृह अधिक प्रशस्त आणि पूर्णतः वातानुकूलित करण्यात आले आहे. आरामदायी खुर्च्या, आकर्षक प्रकाशयोजना आणि आधुनिक अंतर्गत सजावट यामुळे सभागृहाला सत्तेच्या केंद्राचे भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.
मुख्य सभागृहासोबतच महापौर, उपमहापौर तसेच विविध समित्यांच्या सभापतींच्या दालनांचेही नूतनीकरण करण्यात आले असून, यासाठी सुमारे सत्तर लाख रुपयांहून अधिक निधी खर्च झाला आहे. या बदलांमुळे सत्ताधाऱ्यांचा थाट अधिक उठून दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
प्रशासकीय शांततेनंतर आता प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे सभागृहात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष, सत्तासमीकरणे आणि विकासावरच्या चर्चा रंगणार आहेत. मात्र सहा कोटींच्या या सुसज्ज सभागृहात जनतेच्या प्रश्नांना कितपत वाचा फुटते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*