छत्रपती संभाजीनगरच्या मूळच्या आणि सध्या कॅनडामध्ये वकिली करत असलेल्या अर्चना अरुण मेढेकर यांची कॅनडातील ओंटारियो न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. ओंटारियोच्या मुख्य न्यायमूर्ती शेरॉन निकोलस यांनी मंगळवारी (ता. २०) त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. ओंटारियो न्यायालयाच्या अखत्यारीतील फोर्ट फ्रान्सिस–केनोरा विभागासाठी त्या न्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. या नियुक्तीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या शैक्षणिक आणि कायदेविषयक क्षेत्राचा गौरव वाढला आहे.
अर्चना मेढेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली. पदवीनंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात काही काळ वकिली केली. या काळात त्यांना माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर तसेच ज्येष्ठ विधिज्ञ पी. एम. शहा यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी कॅनडाचा मार्ग निवडत यॉर्क विद्यापीठातून एल.एल.एम. पूर्ण केले. त्यानंतर त्या कॅनडाच्या बारच्या सदस्य झाल्या.
२००८ साली अर्चना मेढेकर यांनी स्वतःची ‘लॉ फर्म’ सुरू केली. कौटुंबिक कायदा, कॉर्पोरेट आणि इमिग्रेशन कायदा या क्षेत्रांत त्यांनी प्रदीर्घ काळ प्रभावी काम केले आहे. कौटुंबिक कायद्यातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘लॉ सोसायटी ऑफ ओंटारियो’ने त्यांचा सन्मान केला आहे. त्यांनी कनिष्ठ न्यायालयांसह कॅनडाचे सर्वोच्च न्यायालय आणि ओंटारियोच्या अपील न्यायालयातही अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये काम पाहिले आहे.
कॅनडातील निवडक २५ यशस्वी स्थलांतरितांमध्ये त्यांचा समावेश झाला असून, सामाजिक व कायदेशीर क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ‘मिडिएटर्स बियॉन्ड बॉर्डर्स इंटरनॅशनल’ या संस्थेसोबतही त्यांनी काम केले आहे.
अर्चनाच्या या यशाबद्दल त्यांच्या आई चित्रलेखा मेढेकर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “लहानपणापासूनच अर्चना अभ्यास, क्रीडा आणि वक्तृत्वात पुढे होती. कॅनडातही तिने आपल्या मेहनतीने वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या यशाचा आम्हाला अभिमान आहे.” पती अतुल मराठे यांचा खंबीर पाठिंबा तिला लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*