बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
स्व. अजित पवार यांचे पार्थिव आज विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना रात्री उशिरापर्यंत त्यांचे अंतिम दर्शन घेता येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक बारामतीत दाखल होण्याची शक्यता असून प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.
उद्या सकाळी गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. अंत्ययात्रा गदिमा चौक, विद्यानगरी चौक मार्गे विद्याप्रतिष्ठानच्या आतील रस्त्याने विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पोहोचणार आहे. सकाळी ११ वाजता विद्याप्रतिष्ठान येथील मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
या अंत्यसंस्कार कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील सदस्य तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी, धडाडीचा आणि जनतेशी नाळ जुळवणारा नेता गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*