राज्यातील गरजू आणि गोरगरीब रुग्णांसाठी दिलासा ठरलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून आता आणखी पाच आजारांसाठी मदत उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षाचे शिवसेना वैद्यकीय राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
राऊत यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत या कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील ३६,००० पेक्षा अधिक रुग्णांना ३०१ कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरसाठी १३.५ कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे.
सध्या २० गंभीर आजारांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळते. यात काॅकलिअर इम्प्लांट, हृदय प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, डायलिसिस यांसारख्या उपचारांचा समावेश आहे. आता लवकरच पायाची अँजिओप्लास्टी, सीबीएस सिंड्रोम, मणक्याची शस्त्रक्रिया, कानाच्या शस्त्रक्रिया आणि लहान मुलांच्या दुभंगलेल्या ओठांच्या उपचारांसाठीही या निधीतून मदत मिळेल.
राऊत यांनी यावेळी जाहीर केले की, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविण्याची प्रक्रिया अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरात ‘आरोग्यवारी तथा आरोग्य संवाद यात्रा’ आयोजित करण्यात येत आहे. तसेच, निधीच्या वितरणात गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांना ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याचीही तजवीज करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेला हर्षदा शिरसाट, महानगरप्रमुख अजय महाजन, कार्यालयप्रमुख मनोज वडगावकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून आता अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार आहे, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*