छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या ‘स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल’ या उपक्रमातून घडणाऱ्या यशकथांमध्ये आणखी एक प्रेरणादायी अध्याय जोडला गेला आहे. इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या दानिश शेख या चिमुकल्याने आपल्या गाण्याच्या कलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, त्याच्या या गुणवत्तेची दखल घेत मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी त्याच्या घरी जाऊन पियानो भेट देत अनोख्या पद्धतीने त्याचा सन्मान केला.
‘सिम्फनी ऑफ CSMC स्कूल बँड’ या उपक्रमातून दानिश समोर आला. त्याने सादर केलेल्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहत त्याच्या प्रतिभेचे कौतुक केले. दानिशच्या सहज आणि निरागस गायनशैलीने अनेकांची मने जिंकली.
ही माहिती समजताच आयुक्त जी. श्रीकांत यांनी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शंभूनगर परिसरातील त्याच्या घरी भेट देण्याचा निर्णय घेतला. अरुंद गल्लीतील साध्या घरात पोहोचून त्यांनी दानिशला पियानो भेट दिला. या अनपेक्षित सन्मानामुळे दानिश आणि त्याच्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला.
दारिद्र्याच्या परिस्थितीतही मुलाने गाठलेले यश पाहून त्याच्या वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. या भेटीदरम्यान आयुक्तांनी दानिशकडून गाणेही ऐकले. त्याच्या सादरीकरणाने उपस्थित सर्वजण भारावून गेले.
ही घटना विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना योग्य दिशा आणि संधी मिळाल्यास ते कसे फुलू शकतात, याचे जिवंत उदाहरण ठरली आहे. ‘स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल’ उपक्रमामुळे अशा अनेक विद्यार्थ्यांना नवे व्यासपीठ मिळत असून, त्यांच्या स्वप्नांना बळ मिळत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*