छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेला गारवा आता ओसरत असून, पुन्हा एकदा उष्णतेची तीव्रता वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहराचे कमाल तापमान येत्या काही दिवसांत ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दमट हवामानामुळे उकाड्यात आणखी वाढ होणार असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो.

गेल्या दोन दिवसांत जिल्हाभरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपिटीचाही अनुभव नागरिकांना आला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता आणि तापमानात घट झाली होती. मात्र, आता पुन्हा हवामान कोरडे होत असल्याने तापमानात हळूहळू वाढ होत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस जिल्ह्यात मुख्यतः कोरडे हवामान राहणार आहे. काही भागात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात कमाल तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअसदरम्यान राहील, तर किमान तापमान १८ ते १९ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सापेक्ष आर्द्रता १४ ते ५९ टक्क्यांदरम्यान राहील, तर वाऱ्याचा वेग ७ ते १४ किलोमीटर प्रतितास राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, २५ ते ३१ मार्च या कालावधीतही हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, पर्जन्यमान सरासरीएवढेच राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान सरासरीपेक्षा किंचित कमी राहील, तर किमान तापमान सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागल्याने दुपारच्या वेळेत उष्णतेचा चटका अधिक जाणवू लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः दुपारी बाहेर पडताना काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून बचाव करण्याचे उपाय करावेत, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

306 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क