राज्यातील हॉटेल व्यावसायिक, ढाबेचालक आणि अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी (LPG) पुरवठ्यात २० टक्क्यांची अतिरिक्त वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पूर्वीचा ३० टक्के असलेला कोटा आता थेट ५० टक्क्यांपर्यंत वाढला असून, याची अंमलबजावणी २३ मार्च २०२६ पासून सुरू होणार आहे. इंधन टंचाईचा सामना करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना या निर्णयामुळे मोठा आर्थिक व कार्यात्मक दिलासा मिळणार आहे. 

यापूर्वी आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई निर्माण झाल्याने सरकारने घरगुती सिलिंडर पुरवठ्याला प्राधान्य देत व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर मर्यादित केला होता. त्यामुळे राज्यातील हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट आणि छोटे-मध्यम अन्न उद्योग मोठ्या अडचणीत सापडले होते. अनेक ठिकाणी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी विधानसभेतही हा मुद्दा गाजला होता. त्यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ८ ते १० दिवसांत पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन दिले होते.

दरम्यान, या वाढीव कोट्याचा लाभ घेण्यासाठी केंद्राने काही अटी लागू केल्या आहेत. संबंधित व्यावसायिकांची नोंदणी तेल कंपन्यांकडे असणे बंधनकारक आहे. तसेच, पीएनजी (पाइप नॅचरल गॅस) कनेक्शनसाठी अर्ज करून ते स्वीकारण्याची तयारी दर्शवणे आवश्यक आहे. या अटींमुळे व्यावसायिक एलपीजी वापराचा अचूक आकडा सरकारला समजू शकणार आहे.

या निर्णयाचा लाभ हॉटेल, ढाबे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया उद्योग, दुग्धव्यवसाय, तसेच शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कॅन्टीनना होणार आहे. याशिवाय कम्युनिटी किचन आणि स्थलांतरित मजुरांसाठीच्या भोजन योजनांनाही याचा फायदा होईल. त्यामुळे राज्यातील अन्नपुरवठा साखळी अधिक स्थिर होण्यास मदत होणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

347 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क