अजिंठा: जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे मधमाशांच्या हल्ल्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शनिवारी (दि. २१) दुपारी सुमारे ४:३० वाजण्याच्या सुमारास सुंड धबधबा परिसरात अचानक मधमाशांनी हल्ला चढवून तब्बल ३० पर्यटकांना चावा घेत जखमी केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तात्काळ प्राथमिक उपचार करून अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विशेष म्हणजे जखमींमध्ये अवघ्या ४ महिन्यांच्या बालकाचाही समावेश असून, या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, यापैकी १६ पर्यटकांवर अजिंठा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर उर्वरित १४ गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमींमध्ये अरबाज बुढन पठाण (२७), साहिल पठाण (२५), अजमत अरबाज पठाण (४ महिने), हिना पठाण, मोहसिना पठाण, तंजीम खा पठाण, महक पठाण, सईदाबी बुढन पठाण आणि यास्मिन अरबाज पठाण यांचा समावेश आहे.

दरम्यान, या महिन्यातच अजिंठा लेणी परिसरात मधमाशांनी हल्ला करण्याची ही दुसरी मोठी घटना आहे. शनिवारी रमजान ईद आणि वीकेंड एकत्र आल्यामुळे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. याच वेळी सुंड धबधबा परिसरात अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने पर्यटकांमध्ये घबराट पसरली. डोंगराळ आणि अरुंद परिसर असल्याने पर्यटकांना बचावासाठी पुरेशी जागा मिळाली नाही, परिणामी अनेक जण जखमी झाले.

सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. “लेणी पाहण्याच्या आनंदात जीव धोक्यात येत असेल, तर येथे पुन्हा येणे टाळावे,” अशा तीव्र प्रतिक्रिया काही जखमी पर्यटकांनी व्यक्त केल्या. त्यामुळे प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना करून पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

166 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क