छत्रपती संभाजीनगर : शहरात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, विविध गॅस वितरक एजन्सींवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बुकिंग केलेले हजारो ग्राहक वेटिंगवर असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत शहरातील प्रत्येक गॅस एजन्सीवर लिपिक संवर्गातील एक कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून, शहरातील गॅस वितरण व्यवस्थेत अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे टंचाईबरोबरच अफवांचेही प्रमाण वाढले आहे. परिणामी नागरिक मोठ्या संख्येने एजन्सींवर गर्दी करत आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शहरातील २३ गॅस एजन्सींवर महसूल विभागाचा प्रत्येकी एक लिपिक तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी कार्यालयीन वेळेत एजन्सींवर उपस्थित राहून गॅस वितरण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत. ग्राहकांना वेळेवर ओटीपी मिळतो का, बुकिंग प्रक्रियेत अडचणी येतात का, पर्यायी व्यवस्था कार्यान्वित आहे का, तसेच नियमानुसार गॅस सिलिंडरचे वितरण होत आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. यामुळे एजन्सींच्या कारभारात पारदर्शकता येऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यात एकूण ११ लाख ७७ हजार गॅस ग्राहक असून, त्यामध्ये एचपीसीएलचे सुमारे २.४० लाख, बीपीसीएलचे ३.४० लाख आणि आयओसीएलचे ३.६० लाखांहून अधिक ग्राहक आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*