छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील विविध ११ संवर्गातील २२२ रिक्त पदांच्या भरतीसाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून एकूण ५६ हजार ९०२ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ३१ हजार ८६७ अर्ज वैध ठरले असून तब्बल २५ हजार २३५ अर्ज विविध कारणांमुळे अवैध ठरले आहेत. कागदपत्रांचा अभाव, अपूर्ण माहिती तसेच परीक्षा शुल्क न भरल्यामुळे अनेक अर्ज बाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाची मान्यता मिळाल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे आकृतीबंध सादर करण्यात आला होता. त्यानंतर भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी आयबीपीएस (IBPS) या एजन्सीसोबत करार करण्यात आला. विभागीय आयुक्तांची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेने २२२ पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली.
या भरती प्रक्रियेसाठी १७ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला १८ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, अल्प कालावधीमुळे उमेदवारांकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आली. त्यानुसार महापालिकेने अर्जाची अंतिम तारीख ३१ मार्चपर्यंत वाढवली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
दरम्यान, अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी हॉलतिकिट ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर आयबीपीएसमार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेनंतर गुणवत्ता यादी तयार करून ती महापालिकेकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली.
या भरती प्रक्रियेमुळे शहरातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याने या प्रक्रियेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*