छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीटंचाईवर दिलासा देणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळत असून जायकवाडी धरणातील पाणी टप्प्याटप्प्याने शहराच्या दिशेने पुढे सरकत आहे. मंगळवारी (दि.३१) कारकीनजवळ मुख्य जलवाहिनीच्या वेल्डिंगची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणी फारोळ्यापर्यंत पोहोचविण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी (दि.१) सकाळी पुन्हा पंपिंग करून पाणी कौडगावपर्यंत आणण्यात यंत्रणांना यश आले.
या योजनेअंतर्गत जायकवाडी धरणापासून नक्षत्रवाडीपर्यंत ३८ किमी लांबीची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. यापैकी सुमारे १९ किमीपर्यंत पाणी पोहोचले असून उर्वरित अंतर लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी साधारण आठवड्याचा कालावधी लागेल, असे सूत्रांनी सांगितले.
या प्रकल्पात २५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी उभारण्यात आली असून जॅकवेलवर ३७०० अश्वशक्तीचे दोन पंप बसविण्यात आले आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर धरणातील पाणी सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये आणण्यात आले होते. त्यानंतर २३ मार्चपासून पंपिंग सुरू करून जलवाहिनीत पाणी सोडण्यात आले. कारकीनजवळ वेल्डिंग निखळल्यामुळे निर्माण झालेल्या गळतीची दुरुस्ती करण्यात चार दिवस लागले.
दरम्यान, बुधवारी पंपिंगदरम्यान एका पंपात ट्रिपिंग होऊन तो बंद पडला. त्यामुळे काही काळ एकाच पंपावर काम सुरू ठेवण्यात आले. तरीही दुपारपर्यंत पाणी कौडगावपर्यंत पोहोचविण्यात यश आले. यामुळे जलवाहिनीची स्वच्छता आणि चाचणीही पूर्ण झाली असून कोणतीही मोठी अडचण आढळली नाही.
दरम्यान, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी अंतर्गत जलवाहिन्या, जलकुंभ जोडणी आणि नवीन जलकुंभ उभारणीच्या कामांना गती देण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*