छत्रपती संभाजीनगर : शहर महापालिकेने यंदा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. विविध सवलत योजना, तंत्रज्ञानाचा वापर आणि धडक कारवाई यांच्या जोरावर ३१ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत २३३ कोटी ५५ लाख रुपयांची भर पडली. रात्री उशिरापर्यंत ही रक्कम आणखी वाढेल, असा विश्वास उपायुक्त विकास नवाळे यांनी व्यक्त केला. अखेरच्या आकडेवारीनुसार २३५ कोटींपर्यंत कर वसूली करण्यात यश आले असून, यात मालमत्ता करापोटी २११ कोटी १५ लाख आणि पाणीपट्टीतून २२ कोटी ४० लाख रुपये जमा झाले आहेत.

यंदाच्या आर्थिक वर्षासाठी आयुक्त जी. श्रीकांत यांनी ५०० कोटी रुपयांचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले होते. सुरुवातीला हे उद्दिष्ट अवघड वाटत असले तरी प्रशासनाने वर्षभर सातत्याने प्रयत्न केले. ‘शास्ती से आझादी’ आणि ‘शास्ती से मुक्ती’ या सवलत योजनांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच ‘मैत्र कक्ष’ स्थापन करून मालमत्ताधारकांशी थेट संपर्क साधण्यात आला. कर्मचाऱ्यांना टॅब देऊन वसुली प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली.

थकबाकीदारांवर कठोर कारवाई करत मार्च महिन्यात शंभरहून अधिक मालमत्ता सील करण्यात आल्या. या कारवाईतूनच ९ कोटींहून अधिक रक्कम वसूल झाली. आयुक्त जी. श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विकास नवाळे आणि झोननिहाय अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन वसुली मोहीम राबवली. महापौर समीर राजूरकर आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनीही वेळोवेळी बैठका घेऊन प्रशासनाला दिशा दिली.

दरम्यान, महापालिकेच्या मालकीच्या गाळे, हॉल आणि जागांच्या भाडे करारांमधूनही उत्पन्नात वाढ झाली आहे. एकूण ४८८ गाळ्यांमधून आणि लीजवरील जागांमधून १३.१० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. मालमत्ता विभागाच्या उपायुक्त अपर्णा थेटे आणि सहायक आयुक्त संजय चामले यांनी रेडीरेकनर दराने भाडे आकारणी केल्याने मागील वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात वाढ झाली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

310 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क