छत्रपती संभाजीनगर : शहरातील बीड बायपास रोडवर गांधेली फाट्याजवळ एका हायकोर्टातील वकिलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मिथुन भास्कर (वय ४९, रा. आनंदनगर, बीड बायपास) असे मयत वकिलाचे नाव असून लूटमारीच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला करून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना बुधवारी (१५ एप्रिल) रात्री अकराच्या सुमारास उघडकीस आली.

एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहायक निरीक्षक भारत पाचोळे, जगन्नाथ मेनकुदळे यांच्यासह पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मांडीच्या भागावर धारदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट झाले असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

घटनास्थळी पाहणी करताना पोलिसांना मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळला, तर त्यांची मोपेड (एमएच २० जीएन १६०८) जवळच उभी होती. विशेष म्हणजे, मृतदेहापासून सुमारे १५० मीटर अंतरावर झुडपांमध्ये रक्ताचे डाग आढळून आले आहेत. या संपूर्ण मार्गावर रक्ताचे ठसे दिसून आल्याने, हल्ला झुडपांमध्ये झाला आणि त्यानंतर बचावासाठी ते मुख्य रस्त्याकडे धावत आले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, त्यांच्या दुचाकीमध्ये चावी तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित अवस्थेत मिळून आली आहेत. त्यामुळे ते कोणत्या क्लायंटला भेटण्यासाठी या परिसरात आले होते का, याचा तपास पोलिस करत आहेत. याशिवाय गाडीवर दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे ठसे आढळल्याने संशय अधिक गडद झाला असून संबंधित संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

घटनेची माहिती मिळताच एसीपी भागीरथी पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाच्या मदतीने पुरावे गोळा करण्यात आले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. शहरात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,459 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क