छत्रपती संभाजीनगर : शहरातील महत्वाच्या भागात घडलेल्या अंडरग्राऊंड केबल चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. मात्र वेदांत नगर पोलिसांनी वेगाने तपास करत या प्रकरणातील टोळीचा पर्दाफाश केला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अदालत रोडवरील जिल्हा व सत्र न्यायालयासमोरील बीएसएनएलच्या डक्टमधून पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी सुमारे २०० मीटर लांबीची कॉपर केबल लांबवली होती. या केबलची किंमत तब्बल ८ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येते. पहाटे ३.३० ते ५.३० दरम्यान ही चोरी करण्यात आली होती, ज्यामुळे काही काळ दूरसंचार सेवाही बाधित झाल्या.

या प्रकरणी बीएसएनएलचे उपमंडळ अभियंता सागर पारधे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासाची सूत्रे वेगाने हलवत पोलिसांनी संशयितांचा माग काढत संतोष विलास शिंदे (२०) आणि किरण उर्फ विशाल पवार (२३, रा. सईदा कॉलनी, हर्सुल) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तपासादरम्यान आरोपींनी इतर दोन साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली. अर्जुन शिंदे आणि विशाल शिंदे हे दोघे सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी आरोपींकडून ३.५ लाखांची कॉपर केबल आणि चोरीसाठी वापरलेले सुमारे ५ लाखांचे पिकअप वाहन जप्त केले आहे. उपनिरीक्षक एन. व्ही. सुपे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

शहरात वाढत्या केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्याचे संकेत दिले असून फरार आरोपी लवकरच जाळ्यात अडकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

927 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क