पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदा एकूण ८९.७९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात ९४.१४ टक्क्यांसह कोकण विभागाने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे, तर लातूर विभाग ८४.१४ टक्क्यांसह सर्वात मागे राहिला आहे. यंदाही मुलींनी निकालात बाजी मारत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का ९३.१५ इतका असून मुलांचा निकाल ८६.८० टक्के आहे. त्यामुळे मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. यंदाच्या निकालात एकूण १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला असून अनेक विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शाखानिहाय निकालाचा विचार केला असता, विज्ञान शाखेत ९६.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील काही वर्षांतील आकडेवारीनुसार २०२३ मध्ये ९०.९६ टक्के, २०२४ मध्ये ९७.८२ टक्के, २०२५ मध्ये ९७.३५ टक्के असा निकाल लागला होता. यंदा थोडी घसरण झाली असली तरी विज्ञान शाखेचा निकाल उच्च स्तरावर कायम आहे. कला शाखेत सर्वाधिक ९८.०२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून वाणिज्य शाखेचा निकाल ८७.०३ टक्के आहे. व्यवसाय अभ्यासक्रमात ८२.७४ टक्के तर आयटीआय अभ्यासक्रमात ८१.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकालात मागील वर्षाच्या तुलनेत २.०९ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे.
दरम्यान, विद्यार्थी आपला निकाल mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात. दुपारी १ वाजल्यापासून निकालाची लिंक सक्रिय करण्यात आली आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित वेबसाइटवर जाऊन ‘HSC Examination Result 2026’ या लिंकवर क्लिक करावे, त्यानंतर रोल नंबर आणि आईचे नाव टाकून ‘View Result’ बटणावर क्लिक केल्यास निकाल स्क्रीनवर दिसणार आहे.
मंडळाकडून विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळांचाच वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून निकालानंतर पुढील शैक्षणिक वाटचालीचे नियोजन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*