छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे आज पर्यटकांवर मधमाशांचा अचानक हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली. या घटनेत सुमारे 100 पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेषतः लेणी क्रमांक 16 आणि लेणी क्रमांक 10 परिसरात हा प्रकार घडल्याने पर्यटकांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेच्या वेळी मोठ्या संख्येने पर्यटक लेणी परिसरात फिरत होते. अचानक मधमाशांचा थवा आक्रमक झाल्याने त्यांनी पर्यटकांवर हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये घबराट पसरली आणि परिसरात एकच धावपळ उडाली. अनेकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी धावाधाव केली, तर काही जण सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचा प्रयत्न करत होते.
या घटनेत एक महिला पर्यटक गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतर जखमी पर्यटकांनाही प्राथमिक उपचार देण्यात आले असून काहींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, सलग सुट्ट्यांमुळे वेरूळ लेणी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती. याच गर्दीत हा प्रकार घडल्याने प्रशासनासमोर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या संबंधित यंत्रणेकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*