छत्रपती संभाजीनगर शहराजवळील टेंभापुरी धरणात कामगार दिनाच्या दिवशी एक हृदयद्रावक घटना घडली असून पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मित्रांपैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांमध्ये शैलेश जोगदंड (रा. परभणी), शैलेश हेलसकर आणि अविष्कार लोखंडे (रा. नांदेड) यांचा समावेश आहे. हे सर्वजण वाळूज एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत काम करत होते आणि वयाने २५ ते ३० दरम्यान होते. कामगार दिनानिमित्त सुट्टी असल्यामुळे मित्रांच्या गटाने फिरायला जाण्याचा आणि धरणात पोहण्याचा बेत आखला होता.
नऊ जण पाण्यात उतरले असता त्यापैकी तिघांना पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडू लागले. इतर सहा जण कसेबसे बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यांनी आरडा-ओरड केल्यावर स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले, मात्र तोपर्यंत तिघेही पाण्यात बुडाले होते.
घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधमोहीम राबवून तिघांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यात अशा प्रकारच्या बुडून मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण तलाव, धरणे आणि विहिरींमध्ये पोहण्यासाठी जात आहेत. मात्र पोहण्याचे अपुरे ज्ञान, पाण्याची खोली व परिस्थितीचा अंदाज न आल्याने अशा दुर्घटना घडत आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IFiUHSaNdeRHc992rS9iqG?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*