छत्रपती संभाजीनगर : शहरालगतच्या सावंगी बायपास परिसरात एका शेतात लहान मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह कपड्याने झाकलेल्या अवस्थेत आढळल्याने या घटनेबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. प्राथमिक माहितीनुसार मृत मुलाचे वय अंदाजे पाच ते सहा वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर सिडको एमआयडीसी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. मृत मुलाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून शहरातील हरवलेल्या मुलांच्या नोंदी तपासल्या जात आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून माहिती घेण्याचे कामही सुरू आहे.
मृतदेह ज्या ठिकाणी आढळला त्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, हा मृत्यू अपघाती आहे की घातपात, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सिडको एमआयडीसी पोलिस पुढील तपास करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*