छत्रपती संभाजीनगर शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेला तब्बल सव्वा महिना मानसिक भीतीत ठेवत १३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ८ डिसेंबर २०२५ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत जवाहर कॉलनी परिसरात घडला. याप्रकरणी १६ मे रोजी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोभा प्रभाकर जोशी (वय ७३, रा. समर्थ को-ऑपरेटिव्ह सोसायटी, जवाहर कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या पतींचे २०१७ मध्ये निधन झाले असून त्या पतीच्या पेन्शनवर उदरनिर्वाह करतात. मुलगा आणि मुलगी अमेरिकेत वास्तव्यास असल्याने त्या एकट्याच राहत होत्या. याचाच फायदा सायबर भामट्यांनी घेतल्याचे समोर आले आहे.
८ डिसेंबर रोजी सकाळी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एका महिलेचा व्हॉईस कॉल आला. तिने स्वतःचे नाव अनन्या शर्मा असे सांगत, तुमच्या नावावर असलेल्या मोबाइल नंबरवरून बेकायदेशीर व्यवहार सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळातच व्हिडिओ कॉलद्वारे पोलीस गणवेशातील व्यक्तीने स्वतःला दिल्ली पोलिसातील आयपीएस अधिकारी सुनील कुमार गौतम म्हणून ओळख करून दिली. त्याने एका आरोपीला अटक केल्याचे सांगत, तुमच्या आयसीआयसीआय बँक खात्याचा वापर मनी लॉन्ड्रिंगसाठी झाल्याचा दावा केला.
सायबर भामट्यांनी जोशी यांना तपासासाठी दिल्लीला येण्यास सांगितले. अन्यथा अटकेची कारवाई होईल, अशी धमकी दिली. घाबरलेल्या जोशी यांनी ऑनलाइन चौकशीस सहमती दर्शवली. त्यानंतर त्यांना रोज सकाळी ९.३० वाजता आणि दुपारी ४.३० वाजता व्हिडिओ कॉलद्वारे ‘ऑनलाइन हजेरी’ लावण्यास भाग पाडण्यात आले. कोणालाही माहिती दिल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही देण्यात आली.
या काळात भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यांची आणि एफडीची माहिती घेतली. “तुमचे नाव प्रकरणातून कमी करण्यासाठी पैसे भरावे लागतील, तपास पूर्ण झाल्यावर रक्कम परत मिळेल,” असे सांगून त्यांनी जोशी यांच्याकडून एफडी मोडून दोन वेगवेगळ्या खात्यांवर १३.५० लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले.
दरम्यान, मानसिक तणावात असलेल्या जोशी अमेरिकेत मुलांकडे गेल्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकार सांगितला. मुलांनी गुगलवर आयपीएस सुनील कुमार गौतम यांची माहिती तपासली असता व्हिडिओ कॉलवरील व्यक्ती आणि खरे अधिकारी यांचे फोटो वेगळे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आपण सायबर फसवणुकीचे बळी ठरलो असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भारतात परत येत पोलिसांत धाव घेतली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*