छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगर परिसरातील विटावा शिवारात लवकी गावाजवळ शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या एका युवकाच्या खुनाचा किचकट आणि थरारक गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फूटेज, सोशल मीडियावरील रील आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सलग चार दिवस आरोपींचा पाठलाग करत दोन आरोपी आणि एका विधिसंघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले. आरोपींनी खून केल्यानंतर सोशल मीडियावर टाकलेल्या “टपका रे टपका” या गाण्यावरील रीलमुळे पोलिसांना तपासात महत्त्वाचा धागा मिळाला.
या प्रकरणातील मयताची ओळख ओमकार चंद्रकांत सूर्यवंशी (२२, व्यवसाय मासेविक्री, रा. रामनगर सांगवी, नांदेड) अशी पटली आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रवी देवीदास दुधमल (१९, रा. नांदेड) आणि सय्यद हाशिम सय्यद हसन (१८, रा. रांजणगाव, शे.पु., ता. गंगापूर) यांचा समावेश असून, एका विधिसंघर्षग्रस्त मुलाचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे.
१८ मे रोजी विटावा शिवारातील लवकी गावाजवळील शेतात एका अनोळखी युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवाल आणि तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून हा खून असल्याचे स्पष्ट झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी विशेष तपास पथकाला सूचना दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील, पोलिस उपनिरीक्षक संजय जगताप आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील विविध मार्गांवरील सीसीटीव्ही फूटेज बारकाईने तपासण्यात आले. त्यामध्ये संशयास्पद दुचाकी दिसून आल्यानंतर संबंधित मॉडेलच्या दुचाकींची मागील चार वर्षांतील विक्री माहिती विविध शोरूममधून मागविण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांच्या शरीरयष्टीशी साधर्म्य असलेल्या युवकांचा शोध घेत सोशल मीडिया अकाउंट्सची छाननी केली. त्यावेळी आरोपींनी खून केल्यानंतर “टपका रे टपका” या गाण्यावर रील बनवून सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे उघड झाले. आरोपी नांदेड येथील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने तेथे धाव घेतली.
सलग तीन दिवस आरोपी राहत असलेल्या भागात पाळत ठेवण्यात आली. पोलिस अंमलदारांनी वेशांतर करून भाजीपाला विक्रेत्यांच्या रूपात गुन्हेगारांच्या वस्तीत फिरत माहिती गोळा केली. तपासादरम्यान आरोपी १४ मेपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. आरोपींच्या सोशल मीडिया अकाउंटवरील इतर साथीदारांचे फोटो तपासण्यात आले. आरोपी परराज्यात फरार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने परजिल्ह्यात वेशांतर करून संशयितांवर पाळत ठेवली. अखेर आरोपी परराज्यातून परिसरात परतल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मयत ओमकार सूर्यवंशी याचा आरोपींसोबत दारू पिताना वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून आरोपींनी संगनमताने त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने गळा चिरून त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी आणि मयत यांच्यात यापूर्वीही काही जुना वाद असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे.
तपासादरम्यान अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत आणि गुंड प्रवृत्तीचे असल्याचे समोर आले आहे. आरोपींवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये चोरी, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. पोलिसांकडून त्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डची सखोल पडताळणी सुरू आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील, संजय जगताप, बाबासाहेब काकडे, अरुण उगले, अमोल मनोरे, राजू वाघ, सूरज अग्रवाल, नितीन इनामे, समाधान पाटील, प्रकाश वाघ, वैभव गायकवाड, रोहित चिंधाळे, हनुमान ठोके, संदीप तागड आदींच्या पथकाने पार पाडली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*