छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर ‘डॉन’चे रील बनवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांच्या टोळीने १८ वर्षीय युवकाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना सिडको परिसरात घडली. सिडको पोलिस ठाण्यापासून अवघ्या १०० फूट अंतरावरील रामलीला मैदानात शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. चाकूचे आरपार वार झाल्याने मोठा रक्तस्त्राव होऊन उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण सुरेश मांडोळे (१८, रा. संभाजी कॉलनी, एन-६, सिडको) असे मृत युवकाचे नाव आहे. तर प्रसन्नजीत ऊर्फ चिक्या प्रमोद हिवाळे (२०, रा. जे सेक्टर, संत ज्ञानेश्वरनगर), अरुण पद्मसिंह भूल (१९, रा. ब्रिजवाडी) यांच्यासह अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृताची आई रेणुका मांडोळे यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी रात्री कुटुंबीयांनी साडेनऊच्या सुमारास एकत्र जेवण केले. त्यानंतर प्रवीण रात्री १० वाजता घरातून बाहेर पडला. दरम्यान, मध्यरात्री २ वाजता प्रवीणचा मित्र काळू ऊर्फ शुभम बिल्डा घरी आला आणि प्रवीणचा अपघात झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी प्रसन्नजीत हिवाळे याने प्रवीण आणि त्याचा मित्र काळू यांना फोन करून रामलीला मैदानावर बोलावले होते. तेथे जुन्या वादातून प्रवीणला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर प्रसन्नजीतने चाकूने प्रवीणवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रवीणला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र पहाटे साडेपाचच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मुख्य आरोपी प्रसन्नजीत हा एका नामांकित शिक्षण संस्थेत हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असून सोशल मीडियावर ‘डॉन’च्या प्रतिमेचे रील बनवत असल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे. खून केल्यानंतर प्रसन्नजीत व अरुण फरार झाले होते. तांत्रिक तपास व मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी नेवासा येथून दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध सुरू असून पुढील तपास सिडको पोलिस करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,017 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क