छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक परिसरातील शिवाजीनगर भागात केंद्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी (दि. २९) मोठी कारवाई करत एका घरावर छापा टाकला. सुमारे आठ ते दहा तास चाललेल्या या कारवाईदरम्यान सखोल चौकशी करण्यात आली असून तपास यंत्रणेला काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कमळापूर-रांजणगाव रस्त्यावरील श्रद्धा शेणपुंजी शिवाजीनगर कॉलनीमध्ये केंद्रीय तपास यंत्रणेचे पथक सकाळी दाखल झाले. या पथकात चार अधिकारी, एक कमांडो तसेच महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता. कारवाईदरम्यान स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली. संबंधित इमारतीभोवती पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत चहूबाजूंनी घेराव घातला होता. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित इमारतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून परराज्यातील एक मोटार मेकॅनिक वास्तव्यास होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने केंद्रीय तपास यंत्रणा त्याच्यावर गुप्तपणे नजर ठेवून होती. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार थेट छापा टाकून घराची झाडाझडती घेण्यात आली.

या कारवाईत काही संशयास्पद कागदपत्रे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तपासाच्या अनुषंगाने दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची चर्चा असली तरी याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

विशेष म्हणजे, अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीही केंद्रीय तपास यंत्रणेने जुन्या शहरासह एमआयडीसी वाळूज परिसरात मोठी कारवाई करून १८ जणांची चौकशी केली होती. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या नव्या कारवाईमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून तपास यंत्रणेच्या पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,217 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क