जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून अंतरवली सराटी येथे सुरू असलेले त्यांचे उपोषण मध्यरात्री स्थगित करण्यात आले. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसणाऱ्या जरांगे यांनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत तब्बल दीड तास चाललेल्या सविस्तर आणि सकारात्मक चर्चेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यापूर्वी त्यांनी मराठा आरक्षण विषयावरील अभ्यासकांसोबतही सखोल चर्चा करून सरकारच्या मसुद्याची छाननी केली होती.
कडक उन्हात आणि कोणत्याही मंडपाशिवाय उपोषणाला बसल्याने मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली होती. राज्य सरकारचे शिष्टमंडळ भेटीला येण्यापूर्वीच त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे आंदोलनस्थळी काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, चर्चेनंतर सकारात्मक तोडगा निघाल्याने अखेर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सादर केलेल्या मसुद्यात काही आवश्यक सुधारणा सुचवत जरांगे यांनी अभ्यासकांची मते घेतली. अभ्यासकांनी मसुद्याला मान्यता दिल्यानंतर जरांगे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण स्थगित केले.
यावेळी बोलताना जरांगे यांनी सांगितले की, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना शैक्षणिक प्रवेशापूर्वी जात प्रमाणपत्र देण्यासाठी स्पष्ट शासन निर्देश काढण्यात यावेत. सातारा गॅझेट प्रक्रियेसाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी देण्यात आला असून मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील शासन निर्णय काढण्यात येणार आहे.
सरकारने ५८ लाख कुणबी नोंदी ग्रामपंचायत स्तरावर जाहीर करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यापैकी ३९ लाख नागरिकांना प्रमाणपत्रे देण्यात आली असून उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही लवकरच प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. तसेच स्वतंत्र मराठा-कुणबी मंत्रालय, विशेष हेल्पलाईन आणि आंदोलनातील बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याबाबतही सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचे जरांगे यांनी सांगितले. उपोषण सोडल्यानंतर ते पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी हॉस्पिटलकडे रवाना झाले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*