छत्रपती संभाजीनगर : शहरातील कर्णपुरा येथे दर्शनासाठी निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला दोन तोतया पोलीसांनी गाठून त्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस असल्याची बतावणी करत तपासणीच्या नावाखाली हातचलाखीने ८ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरून नेण्यात आल्या. हा प्रकार ३१ मे रोजी सायंकाळी ४.४५ वाजता रामनगर बसस्टॉपजवळील लाईफ हॉस्पिटलसमोर घडला.

याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. उमराव मारोतीराव निकम (वय ७४, रा. विठ्ठलनगर, मुकुंदवाडी) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमराव निकम हे सेवानिवृत्त असून पत्नीसमवेत मुकुंदवाडी परिसरात राहतात. ३१ मे रोजी ते आपल्या पत्नीसह स्कुटीवरून कर्णपुरा येथे दर्शनासाठी निघाले होते. रामनगर बसस्टॉप परिसरातील लाईफ हॉस्पिटलसमोरून जात असताना बुलेट मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले.

सदर व्यक्तींनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत परिसरात तपासणी सुरू असल्याची माहिती दिली. तसेच “मागे मोठे अधिकारी येत आहेत,” असे सांगून त्यांनी निकम यांची तपासणी करण्याचा बहाणा केला. यावेळी उमराव निकम यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या काढून ठेवण्यास सांगण्यात आले. निकम यांनी अंगठ्या काढताच आरोपींनी त्या कागदाच्या पुडीत बांधून देण्याचे नाटक केले आणि हातचलाखीने अंगठ्या लंपास केल्या.

यानंतर आरोपींनी ती पुडी निकम यांच्याकडे देत ती सुरक्षित ठेवण्यास सांगितले आणि घटनास्थळावरून पसार झाले. काही वेळाने संशय आल्याने निकम यांनी पुडी उघडून पाहिली असता त्यामध्ये सोन्याच्या अंगठ्यांऐवजी दगडाचे दोन खडे आढळून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बहुरे करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

544 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क