छत्रपती संभाजीनगर : शहराजवळ असलेल्या वाळूज MIDC परिसरातील रांजणगाव फाटा येथे चोरट्यांनी एका टूल्स विक्रीच्या दुकानाला लक्ष्य करत तब्बल ६० लाख रुपयांच्या महागड्या औद्योगिक टूल्सवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली असून चोरट्यांचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव फाट्याजवळील ई-३४ सेक्टरमध्ये जितेंद्र साळुंके यांचे ‘लक्ष्मी इंटरप्रायजेस’ नावाचे टूल्स विक्रीचे दुकान आहे. या दुकानातून विविध औद्योगिक यंत्रांसाठी लागणाऱ्या सीएनसी आणि व्हीएनसी मशिनरीच्या कटिंग टूल्सची विक्री केली जाते. शनिवारी सायंकाळी सुमारे सात वाजता दुकान नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले होते.
रविवारी सकाळी शेजारील ट्रान्सपोर्ट चालकाने दुकानाचे शटर उचकटलेले दिसल्याने कर्मचारी पवन सरोदे यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर सरोदे आणि दुकानमालक साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकानात प्रवेश केल्यानंतर आत ठेवलेले सीएनसी व व्हीएनसी मशिनरीसाठी लागणारे सुमारे ६० लाख रुपये किमतीचे महागडे कटिंग टूल्स चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात काही संशयित हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली असून त्याआधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
औद्योगिक क्षेत्रातील महागडे टूल्स लक्ष्य करून करण्यात आलेली ही चोरी नियोजनबद्ध असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, या घटनेमुळे रांजणगाव फाटा व एमआयडीसी परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*