छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरातील गट क्रमांक १६० मधील उमानगर येथे मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. घरासमोर खेळत असलेल्या अवघ्या तीन वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला करून तिच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ६) सायंकाळी घडली. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सृष्टी निखिल बाहेती (वय ३) असे जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सृष्टी घरासमोर खेळत होती. तिच्या हातातील वॉटर बॉटलमधील पाणी संपल्याने ती घराकडे पाणी आणण्यासाठी जात असताना एका मोकाट कुत्र्याने तिच्यावर झडप घातली. कुत्र्याने तिच्या कानाजवळ, मानेवर तसेच डोक्यावर चावे घेत तिला रक्तबंबाळ केले. चिमुकलीच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले.

घटनेची माहिती मिळताच तिचे पालकही घराबाहेर धावत आले. गंभीर जखमी अवस्थेतील सृष्टीला तातडीने शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

या घटनेमुळे उमानगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने लहान मुले, वृद्ध आणि पादचारी नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. दरम्यान, यापूर्वी नारेगाव येथेही साडेतीन वर्षीय मुलीवर मोकाट कुत्र्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्या घटनेनंतर महापालिकेने काही दिवस कुत्रे पकडण्याची मोहीम राबविली होती. मात्र, सध्याच्या घटनेनंतर महापालिकेच्या कुत्रे नियंत्रण व लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

629 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क