छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामीण पोलीस प्रशासनाने विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १,१४९ वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईत एकाच दिवसात तब्बल १३ लाख ८४ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी जिल्ह्यातील अपघातांच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता, बहुतांश प्राणघातक अपघात हे हेल्मेटचा वापर न करणे, भरधाव वेग, राँग साईडने वाहन चालविणे, स्टंटबाजी आणि निष्काळजीपणे वाहन चालविणे यामुळे होत असल्याचे निदर्शनास आले. सन २०२५ मध्ये जिल्ह्यात ८४६ अपघातांची नोंद झाली असून त्यामध्ये ५३८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३४२ अपघात दुचाकीस्वारांचे असून ३५७ नागरिकांनी जीव गमावला आहे.
जानेवारी ते मे २०२६ या कालावधीतही ३९८ अपघातांची नोंद झाली असून २२९ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील दीड वर्षातील आकडेवारीनुसार ५८२ दुचाकी अपघातांमध्ये ५०१ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रकरणांमध्ये हेल्मेटचा वापर न केल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर ८ जून रोजी जिल्ह्यातील सर्व २३ पोलीस ठाणे आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या सहभागातून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या ५६३ जणांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली. तसेच सिग्नल जंपिंगच्या १३२, विना परवाना वाहन चालविण्याच्या ८९, वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ६१, ट्रिपल सीटच्या ५१ आणि विना सीटबेल्ट वाहन चालविणाऱ्या ३० चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी नागरिकांना हेल्मेटचा नियमित वापर, वेगमर्यादेचे पालन आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*