छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त ९ गावांमध्ये ‘वसुंधरा’ या सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीसह राज्य शासन आणि स्थानिक लोकसहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी एकूण १६ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ऑगस्ट २०२६ ते जुलै २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील ही गावे जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३० ते ४० किलोमीटर अंतरावर आहेत. दरवर्षी एप्रिल ते जूनदरम्यान या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांद्वारे पाणीटंचाई दूर करून शेतीला शाश्वत आधार देण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे.

या प्रकल्पांतर्गत ६,१६७ हेक्टर क्षेत्रावर पाणलोट विकासाची कामे करण्यात येणार असून, त्यातून सुमारे २० टक्के क्षेत्र सिंचनाच्या कक्षेत आणण्याचे नियोजन आहे. प्रकल्पाचा थेट लाभ २,३९८ कुटुंबांतील सुमारे ११,२६८ ग्रामस्थांना होणार आहे.

एकूण निधीपैकी टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सकडून ९.३३ कोटी रुपये, महाराष्ट्र शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून ५.४० कोटी रुपये, तर स्थानिक समुदायाच्या लोकसहभागातून १.३३ कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) या संस्थेमार्फत प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

गावांमध्ये पिण्याचे पाणी वर्षभर उपलब्ध करून देणे, जमिनीतील ओलावा वाढवून कृषी उत्पादकता सुधारणे, हवामान-अनुकूल शेतीला प्रोत्साहन देणे तसेच अल्पभूधारक, शेतमजूर आणि भूमिहीन कुटुंबांसाठी रोजगार व उपजीविकेच्या संधी निर्माण करणे, ही या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या उपक्रमामुळे ९ गावांच्या पाणी व शेती व्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल अपेक्षित आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

642 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क