छत्रपती संभाजीनगर : शहरात कुरिअरच्या माध्यमातून पंजाबसह इतर राज्यांतून सुरू असलेल्या शस्त्र तस्करीचा गुन्हे शाखेने मोठा पर्दाफाश केला आहे. गुन्हेगारांच्या हाती पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी ६६ घातक शस्त्रे जप्त करत मोठी कारवाई केली. ही कारवाई ९ जून रोजी मिसारवाडी परिसरात करण्यात आली. या प्रकरणात समीर खान सलीम खान ऊर्फ सोनू (वय २६) याला अटक करण्यात आली असून त्याचा लहान भाऊ मुनावर खान सलीम खान ऊर्फ लाला (वय २४) हा फरार झाला आहे.

पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनावर खान हा सिडको पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. मिसारवाडी परिसरात कुरिअरद्वारे मोठ्या प्रमाणात चाकू आणि सुरे आल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम आणि त्यांच्या पथकाने मिसारवाडीतील गल्ली क्रमांक ७ मधील समीर खानच्या घरावर छापा टाकला.

झडतीदरम्यान पोलिसांना ५८ घातक चाकू आणि ८ फायटर असा एकूण ६६ शस्त्रांचा साठा आढळून आला. ही शस्त्रे अवघ्या ७०० ते २ हजार रुपयांत शहरातील गुन्हेगारांना विकली जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

दोन्ही भाऊ मोठ्या आंतरराज्यीय टोळीशी संबंधित असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत ही शस्त्रे कोणत्या व्यक्तींना विकण्यात आली, याचा तपास सुरू असून आरोपींच्या मोबाईलमधील माहितीच्या आधारे अनेक गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आले आहेत. तसेच कोणत्या कुरिअर कंपनीच्या माध्यमातून हा शस्त्रसाठा शहरात पोहोचला, याबाबतही पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,265 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क