छत्रपती संभाजीनगर : शहरातील हनुमान नगर परिसरात पुंडलिकनगर पोलिसांनी बुधवारी पहाटे धडक कारवाई करत नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त केला. या कारवाईत Nitrosun-10 या प्रकारातील 141 गोळ्या तसेच एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून तिघांविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस ॲक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई हनुमान नगर गल्ली क्रमांक 2 येथे बुधवारी पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणात जयेश संजय पवार, मंगल तनपुरे आणि सोनल तनपुरे यांना आरोपी करण्यात आले आहे. आरोपी जयेश पवार याच्या ताब्यातून विनापरवाना बेकायदेशीररीत्या नशेच्या गोळ्या आढळून आल्या. तर मंगल तनपुरे आणि सोनल तनपुरे यांनी या गोळ्यांच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

विशेष म्हणजे, आरोपी मंगल तनपुरे हिच्यावर यापूर्वी खुनाच्या गंभीर गुन्ह्यात सहभागाचा आरोप असून त्या प्रकरणात ती काही वर्षे कारागृहात होती, अशी माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आल्यानंतर तिने पुन्हा बेकायदेशीर कारवायांना सुरुवात केल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. परिसरात तिची दहशत निर्माण झाली होती आणि गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

पुंडलिकनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शहरात सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असून पुढील तपास पुंडलिकनगर पोलीस करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

816 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क