छत्रपती संभाजीनगर :  शहरातील एका नामांकित करिअर अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याला बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, संबंधित पी.टी. प्रशिक्षक आणि अकॅडमीच्या व्यवस्थापकाविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भारत करिअर अकॅडमीत पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणारा एक अल्पवयीन विद्यार्थी प्रशिक्षण घेत होता. दरम्यान, अकॅडमीचे पी.टी. प्रशिक्षक व व्यवस्थापक विवेक डाकणे यांनी किरकोळ कारणावरून विद्यार्थ्याला बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याला शारीरिक दुखापत झाली असून त्याचा मानसिक छळही झाल्याचे समोर आले आहे.

या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यामध्ये संबंधित प्रशिक्षक विद्यार्थ्याला मारहाण करताना स्पष्टपणे दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे फुटेज पोलिसांच्या हाती लागल्यानंतर तपासाला वेग आला आहे. विद्यार्थ्यावर झालेल्या कथित अत्याचारामुळे अकॅडमीतील शिस्तीच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

घटनेनंतर पीडित विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी तातडीने छावणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. फिर्यादीत विद्यार्थ्याचा शारीरिक तसेच रॅगिंगसदृश प्रकारातून मानसिक छळ करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती समोर आल्यानंतर पालक व नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित अशा गंभीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही पुढे येत आहे. छावणी पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,365 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क